कै.शंकर धोंडिभाऊ उजघरे (नाना)

  • शंकर नाना उजघरेशंकर नानांचा जन्म ११ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. सर्व लहान थोर त्यांना नाना म्हणत.परिस्थिती अभावी त्यांना शिक्षण काही घेता आले नाही, घरची परिस्थिती बेताची असल्याने तारुण्यात नानांनी कामासाठी मुंबई गाठली. सन १९६० साली मुंबई कर्नाक बंदर येथे हमाली केली. १९७६ साली ते मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती झाले. आपल्या कामामध्ये मन लावून काम करून मिळालेली नोकरी अत्यंत निष्ठेने व प्रामाणिक पणे करून ते नोकरीतून निवृत्त झाले.
    निवृत्ती नंतर त्यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. नानांच कुटुंब एकत्र पद्धतीचे असल्याने सर्व गुण्यागोविंदाने राहत. नानांना धार्मिक आणि सामाजिक कामाची प्रचंड आवड त्यामुळे अशा कामात ते सक्रिय सहभाग घेत असत व मार्गदर्शन करत असत. गोरगरिबांना त्यांचा नेहमी मदतीचा हात असे. नानांच्या स्वभावाचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला ते कायमस्वरूपी आपले करून टाकत असत,त्यांच्याशी ओळख झालेली व्यक्तीला आपण नानांचे कधी झालो,हे कळतच नसे. कारण त्यांचे बोलणे अतिशय आत्मीयतेने होते. भेटलेल्या व्यक्तीला नेहमी हसून मनापासून बोलत. नानांवर ग्रामस्थांचा मोठा विश्वास, गावातील हनुमान देवस्थानचे खजिनदार पद नानांनी कित्तेक वर्ष अतिशय चोख पणे सांभाळलं. गावाच्या वैभवात भर घालणारी अनेक कामे नानांनी केली. सर्व कामात सदैव ते पुढे राहत वय झाले तरी गावाच्या कामासाठी अनेक वेळा त्यांनी लांबचे प्रवास केले.गावचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा हा नानांचा नेहमीचा अट्टाहास त्या कामासाठी काही पण करायची तयारी नेहमी त्यांची असायची. गावात चालू असलेल्या जलसंधारणाच्या कामात नानांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
    एक उत्कृष्ट कुटुंबप्रमुख कसे असावे,एक गाव कारभारी कसे असावे याचे उदाहरण "नाना" दोन्ही गोष्टी त्यांनी उत्तम प्रकारे निभावल्या.अशा वेगळ्या नानांना दि.१० एप्रिल २०१६ रोजी देवाने आपल्या घरी बोलावून घेतले, कुटुंबासोबतच गारखिंडी गाव एका सच्चा व्यक्तीमत्वास त्या दिवशी पोरका झाला. एक उत्कृष्ट कारभारी व गोड माणूस गावाने गमावला याचे दुःख सर्वांच्या मनी आजही आहे. नानांच्या मागे त्यांचे दोन्ही चिरंजीव रामदास व लक्ष्मण हे दोघेही गावच्या सामाजिक कामात सक्रिय सहभागी असतात, नानांचा वारसा ते अतिशय चांगल्या प्रकारे जपत आहेत.
    जीवनाच्या वाटचालीत माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला याच गोष्टीला अधिक महत्व असते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला, परंतु अनेकांचा स्नेही आपला आपलासा वाटणारा आधारवड पितृतुल्य नाना गेले... नाना गेले हेच बोल ओठावर रेंगाळत राहिलेत. अशा पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली...


गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!